डॉ.बाबासाहेब आंबेडकर अथांग व्यक्तिमत्त्व... | soul Marathi Blog

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षण हा विकसित समाजाचा आरसा आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. असं डॉ.बाबासाहेबांचं ठाम मत होतं.

१४ एप्रिल १८९१ साली एका अस्पृश्य समाजात जन्मलेले बाबासाहेब हे पुढे जाऊन अस्पृश्यांमधून पहिल्यांदाच पदवीधर म्हणून उत्तीर्ण होतील हे खरंतर स्वप्नवतच होते. तेही वर्गाच्या बाहेर बसून. कारण त्या काळी अस्पृश्य मुलांनी शिक्षण घेणं म्हणजे गुन्हाच होता. त्याही परिस्थितीत बाबासाहेब मुंबई युनिव्हर्सिटीतून बी.ए.ची पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि तिथून ते एम्.ए.ची परीक्षा कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून उत्तीर्ण झाले.

त्यांच्या परदेशी शिक्षणासाठी बडोदा संस्थांनचे "सयाजीराजे गायकवाड" यांनी दरमहा रू. २५ /- शिष्यवृत्ती देत बाबासाहेबांना खूप 'मोलाची मदत' केली. त्याचबरोबर कोल्हापूर संस्थानचे "छत्रपती शाहू महाराज" यांनी सुद्धा बाबासाहेबांना वेळोवेळी मदत केली.

अस्पृश्य समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. समाजाच्या प्रत्येक थरात अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचावे आणि लोकांनी विचारांनी आणि आचाराने समृद्ध व्हावे असं बाबासाहेबांना नेहमी वाटत असे . ते आयुष्यभर दलितांना समाजात योग्य वागणूक मिळावी त्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून हयातभर लढत राहिले.

त्यांना मनापासून वाटत असे की, अस्पृश्य लोकांप्रती सवर्णांच्या मनात कधीतरी सद्भाव जागृत होईल आणि जेणे करून मागासलेला समाज मुख्य प्रवाहात येऊन सन्मानानं जीवन जगेल. मात्र आजही बहुतांश ठिकाणी जातीवाद आणि जातीभेद पाहायला मिळतोच. म्हणूनच "मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो; पण हिंदू म्हणून मरणार नाही." असं बोलून त्यांनी बुद्ध धम्म स्विकारला.

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात पंजाब केसरी लाला लजपतराय आणि बाबासाहेबांची ओळख झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत,असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्यातूनच पुढे दोघांची ओळख झाली होती, एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरु होता त्यावेळी प्रा. एडविन रॉबर्ट अँडरसन सेलिग्मन हे तिथे आले त्यांनीसुद्धा त्यांच्या सोबत चर्चेत भाग घेतला. प्रा. एडविन हे बाबासाहेबांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रचं सखोल ज्ञान ऐकून ते प्रभावित झाले होते. त्यांनी बाबसाहेबांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले होते कि, भीमराव आंबेडकर भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे, तर अमेरीकेतील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहेत.

आजकाल काही स्वयंघोषित बुद्धिवंत (जंत) लोकांच्या पोटात डॉ. बाबासाहेबांचं नाव ऐकूनच तिडीक उठते. त्यातलेच काही शेणकिडे समाजमाध्यमांवरून बाबासाहेबांची बदनामी करत असतात त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत असतात. त्यांना माझं एकच सांगणं आहे "बाबांनो, तुमच्या सात पिढ्यांकडे मिळून नसेल एवढं ज्ञान त्या एकट्या महामानवाकडे होतं.

बाबासाहेब हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री, कुशल राजकारणी, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यावधी शोषित पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र भारताचे पहिले "कायदे मंत्री" आणि स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. हेही त्या बुद्धिजंतांनी लक्षात घ्यावे. उगीच नाही लोक त्यांना विश्वरत्न म्हणत. अशा लोकांकडे मी कधीच लक्ष देत नाही आणि देऊही नये, काय म्हणून शेणात दगड मारावा? या ठरावीक लोकांना बाबासाहेबांबद्दल कधीच प्रेम, सद्भावना, त्यांच्याविषयी अभिमान त्यांच्या मोठेपणाचं कौतुक नव्हतं आणि नाही.

आपल्या राजकीय व्यवस्थेने सुद्धा बाबासाहेबांचा नेहमीच 'वापर' केला आणि द्वेष केला असं मला स्वतःला वाटतं. आणि असं नसतं तर आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न द्यायला त्यांच्या मृत्यूनंतर ३४ वर्षे लागली नसती. पण एक गोष्ट कधी कधी उगीच मनात येते कि, बाबासाहेबांचा एवढाच गुन्हा होता का की ते एका दलित कुटुंबात जन्मले म्हणून त्यांचं अभाळाएवढं कार्य झाकोळलं गेलं? त्याऐवजी जर ते एखाद्या उच्च सवर्ण जातीत जन्मले असते तर....??? परमपूज्य डॉ.भिमराव आंबेडकर अर्थात आपल्या सर्वांचे लाडके नित्य पूज्यनीय बाबासाहेबांना विनम्र अभिवादन !!!

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN